'या' सरकारी बँकांत लवकरच हजारो जागांसाठी भरती

नवीन भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना खासगी आणि विदेशी बँकांच्या तुलनेत वेतन अधिक असणार आहे. 

Updated: Dec 17, 2018, 05:19 PM IST
'या' सरकारी बँकांत लवकरच हजारो जागांसाठी भरती title=

मुंबई : सरकारी नोकरीसाठी देशातील अनेक तरुण प्रत्येक क्षेत्रात प्रयत्न करत असतात. बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सरकारी बँकांकडून अनेक पदांसाठी हजारो जागांची बंपर भरती काढली जाणार आहे. या भरतीमुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. देशातील बँकिंग क्षेत्रात येत्या काळात तरुणांना काम करण्याची संधी मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक या आर्थिक वर्षात एक लाख नोकऱ्या घेऊन येत आहे. या बँकांच्या वेल्थ मॅनेजमेंट, विश्लेषण, डिजिटल सेवा आणि ग्राहक सेवा या विभागातील विविध पदांसाठी ही मेगाभरती आहे. बँक या क्षेत्रात व्यवसायाचा विस्तार करुन व्यवसाय वाढवण्याच्या तयारीत आहे.

सरकारी बँकांनी आव्हान स्वीकारलं

देशातील प्रसिद्ध मनुष्यबळ विकास कंपनी टीमलीजनुसार, सरकारी बँकेत क्लार्क कमी आणि अधिकारी जास्त असतील. सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचारी हे क्लार्क या पदात मोडतात. एसबीआयमध्ये ही आकडेवारी ४५ टक्के इतकी आहे. टीमलीजनुसार, सरकारी बँकामधील कामाच्या पद्धतीत निश्चित बदल करावा लागेल. भरती प्रकिया दरम्यान या बाबीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

आकर्षक वेतन

गेल्या दोन वर्षांत सरकारी बँकांनी दरवर्षी ४७ हजार कर्मचाऱ्यांना क्लार्क, मॅनेजमेंट ट्रेनी आणि अधिकारी पदावर नियुक्त केले आहे. एका इंग्रजी वृ्त्तपत्रानुसार, सिंडिकेट बँकेच्या अधिकाऱ्यांने सांगितले की, यावर्षी ५०० जणांना नोकरीत रुजू करणार आहे. तसेच या नवीन भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना खासगी आणि विदेशी बँकांच्या तुलनेत वेतन अधिक असणार आहे.  बँक व्यवहारातील किचकटपणा कमी करण्यासाठी नवी भरती केली जात आहे.

बँकेची तयारी

सरकारी बँक आता खासगी बँकेतील कर्मचाऱ्यांना मुख्य नैतिकता अधिकारी, मुख्य मार्केटिंग अधिकारी, मुख्य गुंतवणूक अधिकारी यासोबतच अनेक पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. टीमलीजनुसार, या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन हे ५० लाखांपेक्षा अधिक असेल. एसबीआय लवकरात लवकर भरती प्रक्रिया करण्यासाठी इच्छुक आहे. सोबतच बँक ५ हजार नव्या लोकांना इतर पदांसाठी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. आयडीबीआय बँकदेखील काही पदांसाठी भरती करण्याच्या तयारीत आहे.