उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे रश्मी ठाकरे...

उद्धव ठाकरेंच्या सगळ्यात जवळच्या समर्थक...

Updated: Nov 27, 2019, 05:36 PM IST
उद्धव ठाकरेंचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे रश्मी ठाकरे... title=
Photo Credit - backgrounddownload.com

मुंबई : डोंबिवलीतल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या पाटणकरांची मुलगी मातोश्रीचं माप ओलांडून ठाकरे झाली. तेव्हापासूनच तुमच्या सुखदुःखात पाठिशी राहीन आणि सदैव भक्कम साथ देईन, ही उद्धव ठाकरेंना दिलेली शपथ रश्मी ठाकरेंनी अत्यंत सुंदर निभावली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं ही तमाम शिवसैनिकांची, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची इच्छा होतीच, पण कित्येक वर्षांपासूनचं हे रश्मी ठाकरेंचं स्वप्न होतं. 

रश्मी ठाकरेंसाठी हा स्वप्नपूर्तीचा आणि आनंदाचा सुवर्णक्षण. उद्धव ठाकरेंच्या पत्नीची भूमिका निभावताना त्यांनी ठाकरेंची संस्कारी आणि मातोश्रीच्या परंपरा जपणारी सून, शिवसैनिकांच्या वहिनीसाहेब, आदित्यची प्रोत्साहन देणारी आई अशा भूमिकाही रश्मी अत्यंत चोख निभावत आहेत. उद्धव ठाकरेंच्या सगळ्यात जवळचा समर्थक, राजकीय सल्लागार आणि सर्वात मोठं बलस्थान म्हणजे रश्मी ठाकरे. 

सार्वजनिक कार्यक्रमात उद्धव ठाकरेंची पत्नी आणि आदित्यची आई म्हणून अत्यंत लो प्रोफाईल पण ग्रेसफुल अशी त्यांची उपस्थिती असते. पण पडद्यामागे त्या शिवसेनेच्या अत्यंत सक्रिय अशा कार्यकर्त्या आहेत. मातोश्रीवर आल्यागेल्या पै पाहुण्याचं आगतस्वागत, त्या माँसाहेबांसारख्याच उत्तम सुगरण आहेत. शिवसैनिकांशी विशेषतः शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम सामाजिक आणि राजकीय नेटवर्क असल्यानं राजकीय, सामाजिक अंडरकरंटस रश्मी वहिनींपर्यंत कायम पोहोचत असतात.

रश्मी ठाकरेंचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यापर्यंत आलेल्या प्रत्येक तक्रारीची, माहितीची त्या शहानिशा करतात. विशेष म्हणजे रश्मी ठाकरेंचा जेवढा तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संपर्क असतो तेवढाच त्यांचा मुंबईतल्या उच्चभ्रूंच्या पेज थ्री सर्कलमध्येही वावर असतो. त्यामुळे सगळ्या स्तरातल्या खबरी रश्मी वहिनींपर्यंत अचूक पोहोचतात. 

मुळात रश्मी ठाकरेंचा राजकीय सेन्स अत्यंत चांगला आहे. उद्धव ठाकरेंकडेच शिवसेनेची कमान देण्यासाठी बाळासाहेबांना राजी करण्यात रश्मी ठाकरेंची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती, असं म्हणतात. त्यानंतर राज यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे अत्यंत अस्वस्थ होते, त्यावेळी त्यांना भक्कम आधार देण्यात रश्मी ठाकरेंची महत्त्वाची भूमिका होती. उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकीर्दीत विशेषतः बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना सांभाळण्यात उद्धवना भक्कम साथ देणारा शिवसैनिक म्हणजे रश्मी ठाकरे. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री होत आहेत. प्रत्येक शिवसैनिकासाठी हा आनंदाचा क्षण. पण सर्वोच्च आनंद झाला असेल तो ठाकरेंच्या या सरकारला.