रामदेव बाबांची उत्पादनं ‘आपलं सरकार’वर, राज्य सरकार पतंजलीवर मेहरबान

भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलिच्या उद्योगाची भरभराट झाली असून आता पतंजलीची उत्पादन महाराष्ट्र सरकारचं विकणार आहे. 

Updated: Jan 22, 2018, 01:13 PM IST
रामदेव बाबांची उत्पादनं ‘आपलं सरकार’वर, राज्य सरकार पतंजलीवर मेहरबान title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उद्योगाची भरभराट झाली असून आता पतंजलीची उत्पादन महाराष्ट्र सरकारचं विकणार आहे. 

सरकार पतंजलीवर मेहरबान

महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या डिजिटल सेवेमध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना विक्रीसाठी ठेवण्याबाबत स्पष्ट जीआरच काढण्यात आला आहे. एखाद्या खाजगी कंपनीची उत्पादने अशा पद्धतीने सरकारमार्फत विकण्याची ही पहिलीच वेळ असून सरकार पतंजलीवर एवढे मेहरबान का असा सवाल उपस्थित केला जातोय. 

काय आहे जीआर?

हा मुळ जीआर आपले सरकार सेवा केंद्रांचा राज्यात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी काढण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्यात ५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असल्यास २ सेवा केंद्रे स्थापन केले जाणार आहेत. तर शहरी भागात २४ हजार लोकसंख्येमागे एक तर नगरपंचायत भागात ५ हजारांहून अधिक लोकसंख्या असल्यास २ केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. मात्र आपले सरकार सेवा केंद्रांचा गावोगावी विस्तार करण्याचा निर्णय घेतानाच रामदेव बाबांच्या सर्व उत्पादनांना देखील या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्याचा आदेश सरकारने काढला आहे. 

आपलं सरकार सेवा केंद्रावर काय असतं?

आपले सरकार सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सेवांचा समावेश आहे. त्यातच आता रामदेव बाबांच्या पतंजलिला ई-कॉमर्समध्ये खास स्थान देण्यात आले आहे. यासोबतच सीएससी बझार आणि व्हीएलई बझार यांचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.