मुंबई : अयोध्येत सध्या राम मंदिर भुमिपुजनाची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाला देशभरातू कोणाला निमंत्रण दिलंय ? कोण जाणारेय ? यावरुन सध्या राजकारण सुरु आहे. अशात आता अयोध्येत बुद्धविहार उभारण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीय.
अयोध्येतील वादग्रस्त जागा सोडून अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आठवले म्हणाले. त्यासाठी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांची भेट घेणार आहेत. सरकारकडून बुद्ध विहारासाठी जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आठवलेंनी सांगितले. ट्रस्ट उभारून जागा मिळवून तेथे बुद्ध विहार उभारण्याचा रिपब्लीकचा प्रयत्न असणार आहे.
2 हजार 500 वर्षांपूर्वी भारत संपुर्ण बौद्ध राष्ट्र होते. अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिराचे तसेच बुद्ध विहाराचे ही अवशेष सापडत असल्याचे आठवले म्हणाले. राम मंदिर; मस्जिद आणि बुद्ध विहार उभारून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधनातील सर्व धर्म समभावाचा संदेश जगाला द्यावा असे आठवले म्हणाले.
मंदिर मस्जिद वाद नुकताच मिटला असताना बुद्धविहार का ? या प्रश्नावर देखील त्यांनी उत्तर दिलंय. भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी होते. अयोध्येत बाबरी मस्जिद उभारण्या आधी राम मंदिर होते आणि त्यापूर्वी बुद्ध विहार होते असे आठवले म्हणाले.
पंतप्रधान होण्याची केवळ इच्छा असून चालत नाही, त्यासाठी तेवढी ताकदही लागते. उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची ताकद नाही, असे परखड मत रामदास आठवले यांनी मांडले होते. त्यामुळे आता यावर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.