चंद्रकांत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवले, राज्य महिला आयोगाने मागविला खुलासा

भाजपच्या ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान त्यांना भोवण्याची शक्यता आहे.

Updated: May 28, 2022, 01:04 PM IST
चंद्रकांत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवले, राज्य महिला आयोगाने मागविला खुलासा title=

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी मेळाव्यात बोलताना केलेल्या विधानाबद्दल राज्य महिला आयोगाने त्यांच्याकडून लेखी खुलासा मागविला आहे.

ओबीसी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली होती. "तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या", असं ते म्हणले होते.

तर, या टीकेला उत्तर देताना "आमचं सरकार दडपशाहीचं नाही. मी इतका काही त्याचा विचार करत नाही, त्यांना वाटलं म्हणून ते बोलले असेल", असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले होतं.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे महिला वर्गाचा अपमान झाला आहे. खासदार श्रीमती सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.

आज महिला स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्त महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे.

यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे. तसेच, केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा सादर करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले आहेत.