मनसेला भगदाड पाडत पदाधिकारांचा शिवसेनेत प्रवेश

राज ठाकरेंना मोठा धक्का 

Updated: Feb 1, 2021, 09:34 PM IST
मनसेला भगदाड पाडत पदाधिकारांचा शिवसेनेत प्रवेश  title=

मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येवू लागलीय तसतसं शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात झाली आहे. डोंबिवलीत मनसेला (MNS)  भगदाड पाडत शिवसेनेनं मनसे शहर अध्यक्ष राजेश कदमलाच गळाला लावलं आहे. राजेश कदमसह (Rajesh Kadam)  मनसेतील इतर डझनभर पदाधिका-यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून प्रवेश केला. 

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. राजेश कदम यांचा सेनेत प्रवेश हा मनसेसाठी मोठा धक्का आहे. यावेळी अंबरनाथ येथील भाजपचे सुनील सोनी, तुळशीराम चौधरी आणि अपक्ष सुभाष साळुंके अशा तीन नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. 

 राजेश कदम यांच्यासह 'या' मनसे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश

 १ ) राजेश शांताराम कदम -  मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली   शहर अध्यक्ष . माजी परिवहन सभापती

२) सागर रवींद्र जेधे - मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष 

३ ) दीपक शांताराम भोसले - डोंबिवली शहर संघटक,माजी परिवहन सदस्य 

४) राहुल गणपुले - प्रदेश उपाध्यक्ष, जनहित कक्ष 
 

राजू पाटील यांची प्रतिक्रिया 

गेल्या काही दिवसांपासून राजेश कदम यांच्या फेसबुक वॉलवरील पोस्ट संशयास्पद वाटत होत्या. परंतु ते राज ठाकरेंना मानणारे कट्टर सहकारी होते. कदाचित आगामी निवडणुकीतील आमिषाला बळी पडून त्यांनी मनसे सोडला असावा अशी प्रतिक्रिया मनसे नेते आमदार राजू पाटील यांनी दिली. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी आज मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधले. या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ, बदलापूरमधील अनेक पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.