बोटीतून अलिबागला जाताना मास्क न घातल्यामुळे राज ठाकरेंना हजार रुपयांचा दंड

राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही शिलगावली होती. 

Updated: Sep 21, 2020, 09:23 PM IST
बोटीतून अलिबागला जाताना मास्क न घातल्यामुळे राज ठाकरेंना हजार रुपयांचा दंड title=

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे त्यांना १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 'मुंबई मिरर' या इंग्रजी दैनिकात यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार राज ठाकरे हे शुक्रवारी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जात असताना हा प्रकार घडला. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी उद्घोषणा केली जात होती. मात्र, ही बाब बहुधा राज ठाकरे यांच्या लक्षात आली नाही. परिणामी राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते. यावेळी त्यांनी सिगारेटही शिलगावली होती. हा प्रकार रो-रो बोटीवरील अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने राज ठाकरे यांना नियमाविषयी सांगितले. राज ठाकरे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करत १००० रुपयांचा दंड भरला. 

जमावबंदी असतानाही कृष्णकुंजबाहेर गर्दी; आदित्य ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेरही कार्यकर्त्यांची गर्दी जमल्यामुळे वाद निर्माण झाला होता. हे सर्वजण वरळीतील स्थानिक नागरिक असून ते मनसेत प्रवेश करण्यासाठी कृष्णकुंजवर गेले होते. यावेळी अनेकजण सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करता दाटीवाटीने उभे होते. तसेच सध्या मुंबईत जमावबंदीचे आदेश असताना एकाच ठिकाणी एवढे लोक कसे जमले, याविषयी प्रश्नचिन्हही उपस्थित करण्यात आले होते

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. मुंबईत दरदिवशी कोरोनाचे जवळपास दोन हजार रुग्ण सापडत असल्याने विशेष खबरदारी घेतली जात आहे.

दरम्यान असा प्रकार झालाच नसल्याचा खुलासा मनसे सरचिटणीस सरदेसाई यांनी केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत असा कुठलाही प्रकार झालाच नसल्याचे स्पष्टीकरण सरदेसाई यांनी केलंय.