राज ठाकरेंनी मराठी भाषा दिनी शेअर केला काश्मिरी तरूणीचा व्हिडिओ

आज मराठी भाषा दिन. 

Updated: Feb 27, 2020, 04:34 PM IST
राज ठाकरेंनी  मराठी भाषा दिनी  शेअर केला काश्मिरी तरूणीचा व्हिडिओ title=
Pic Courtesy : Raj Thackeray twitter

मुंबई : मराठी भाषा दिन. आजच्या  मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्यात. त्याचबरोबर त्यांनी एक काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या व्हिडिओचीच जास्त चर्चा होत आहे. त्यांनी मराठी भाषा दिनालाच हा व्हिडिओ का शेअर केला, असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. मात्र, हा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल त्यांना त्याचे महत्व समजू शकेल. राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्यात. त्यांनी एका काश्मिरी तरूणीच्या गाण्याचा एक व्हिडिओ शेअर केला आणि राज यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महाराष्ट्र राज्यासह जगभरात आज मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्य सरकारच्यावतीने विधानभवनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात येत आहे. तर अनेक मान्यवर समाजमाध्यमातून मराठी दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. राज यांनी काश्मिरी तरुणीचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला असून 'हा व्हिडिओ आपल्या राज्याला आपल्या वैभवाची जाणीव करून देवो, अशा शुभेच्छाही राज यांनी दिल्या आहेत.  

मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे शुभेच्छा देताना म्हटले आहे, मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा ! माय मराठी. त्यांनी कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन केले आहे. ते म्हणतात, कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मानदंडच. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
 
या दोन पोस्टनंतर राज ठाकरे यांनी एका काश्मिरी मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात शमीम अख्तर ही काश्मिरी तरुणी 'रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा... सांडीं तू अवगुणू रे भ्रमरा...' हे गीत गाताना दिसत आहे. संत ज्ञानेश्वरांची ही रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायलेली आहे. काश्मिरी वाद्यामेळ्याचा वापर करून शमीम अख्तर ती गायली आहे.