घुसखोरांविरोधात मनसेचा आज महामोर्चा

राज ठाकरे आझाद मैदानावर सभा घेणार 

Updated: Feb 9, 2020, 09:23 AM IST
घुसखोरांविरोधात मनसेचा आज महामोर्चा  title=

मुंबई : मुंबईतील आझाद मैदान इथे आज मनसेचा मोर्चा निघणार आहे.  कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर या भागातून जवळपास १५ ते २० हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. अधिकाधिक नागरिकांचा या मोर्चात सहभागासाठी विभागनिहाय बैठका घेण्यात आल्यात.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत मनसे भव्य मोर्चा काढत आहे. हा मोर्चा गिरगावपासून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणारे आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आझाद मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत. (मनसेत इनकमिंग सुरु; हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन स्वगृही) 

 

या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्ते मरिन लाइन्स इथल्या हिंदू जिमखाना इथून आझाद मैदानात जाणार आहे. त्यानंतर आझाद मैदानात राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे पदयात्रा, सभा यावर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे नजर ठेवली आहे. 

महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी मनसेत पुन्हा प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांचा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘कृष्णकुंज’वर प्रवेश झाला. यावेळी त्यांचे नवा पक्षाचा ध्वज देऊन स्वागत करण्यात आले.

तसेच औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेत प्रवेश केला. तसेच शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेत जाहीर प्रवेश केला.