मुंबई : विजांच्या कडकडाटासह काल नवी मुंबई आणि कोकणात पाऊस झाला होता. आज मुंबईत रात्री 8 नंतर पावसाने अचानक हजेरी लावली. दरम्यान, कोकण आणि पुण्यातही पाऊस पडला. त्यामुळे ऑक्टोबर हिटपासून थोडासा दिलासा मिळालाय. दक्षिण मुंबईत ढगांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. विजेचा लखलखाट आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत.
राज्यात काही भागात पाऊस पडत असल्याने गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त झालेल्यांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. गेले २४ तास मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या काही भागांत पाऊस पडत आहे. दरम्यान, कोकण, गोवा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील दिवसाचे तापमानही २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी झालेय.
हवामान खात्याने आज सायंकाळी हवामान ढगाळलेले असेल असे सांगत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवला होता. मुंबईतील काही ठिकाणी सायंकाळी आठ-साडेआठ वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सायंकाळी आलेल्या पावसाने वातावरणात अधिक गारवा आलाय.