नवी दिल्ली : भारतीय रेल्वे एकीकडे चांगल्या सुविधा देत आहे. तर दुसरीकडे प्रवाशांच्या वाईट वर्तवणुकीला कंटाळून AC कोचमधील सुविधा कमी करण्याचा विचार करीत आहे. एसी क्लासमध्ये प्रवास करणारे लोक हे सुशिक्षित मानले जातात, पण यातील अनेक सुसंस्कृत नसल्याचं समोर येत आहे. कारण एसी कोचमधील टॅावेल, बिछान्याची चोरी वाढली आहे. २०१७-१८ या वर्षी लाखो टॅावेल, चादरी चोरीला गेल्या आहेत.
एसी कोचमधून १४ कोटी रुपयांचे सामान गायब झाल्याची माहिती रेल्वे आधिकाऱ्यानी दिली आहे. या आधी एका वर्षात देशभरात जवळपास 21 लाख 72 हजार 246 अंथरूण-पांघरूण गायब झाली. यात १२ लाख ८३ हजार ४१५ टॅावेल आणि ४ लाख ७१ हजार ०७७ चादरींचाही समावेश आहे.
३, लाख १४ हजार ९५२ उशींचे कवर चोरीला गेले आहे. त्याचबरोबर ५६ हजार २८७ उशी आणि ४६ हजार ५१५ चादरी गायब झाल्या. रेल्वे मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, 'गायब झालेल्या सामानाची किंमत एकूण १४ कोटी आहे, त्यात शौचालयातून मग, फ्लश पाईप, आरसे यांचा देखील समावेश आहे'.
चोरीच्या प्रकारामुळे उच्च श्रेणीतील प्रवाशांसाठी, उत्तम सुविधा देण्यात रेल्वेला अडचणी येत आहेत. यापुढे AC कोचमध्ये दररोज ३ लाख ९० हजार बिछान्यांची सोय केली जात आहे. त्यामध्ये प्रत्येक सेटमध्ये २ चादर, १ टॅावेल, १ उशी, १ कव्हरचा समावेश आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'कोच सहाय्यक माहितीनुसार, शेवटच्या स्टेशनवरील प्रवाशांकडून सर्वात जास्त टॅावेल, चादरची चोरी केली जाते'.