मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं जम्मू काश्मिरातल्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. तसंच अमरनाथ यात्राही दोन वर्षांसाठी बंद ठेवावी, अशी मागणी शिवसेनेनं केलीये. पर्यटन आणि अमरनाथ यात्रा बंद केल्यास तिथल्या दहशतवाद्यांची रसद बंद होईल, असं मत शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी नोंदवलं आहे. काश्मीरमध्ये इतर राज्यांमधील पर्यटकांनी जाऊच नये, असं त्या म्हणाल्या. या बहिष्काराच्या भूमिकेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यावरून इशारा दिला आहे. जे तुमच्या मनात आहे, तेच माझ्याही मनात आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पुलवामा हल्ल्यानंतर आता श्रीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. काश्मिरी नागरिकांना होत असलेल्या मारहाणीच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. आगामी दोन दिवस श्रीनगर बंदची हाक देण्यात आली आहे. श्रीनगरच्या अनेक भागांमध्ये सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, तर संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर आता भारतानं काश्मीरातल्या फुटीरतावादी नेत्यांबाबत कठोर धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. जहाल हुर्रियत नेता मिरवाईज उमर फारूखसह सहा फुटिरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. जम्मू काश्मीर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
अब्दुल गनी भट, बिलाल लोण, हाशीम कुरेशी, फजल हक कुरेशी आणि शब्बीर शाह, या फुटिरतावाद्यांना प्रशासनाने दणका दिला आहे. काश्मीर खोऱ्यातल्या अतिरेकी कारवायांना या फुटिरतावाद्यांचा पाठिंबा राहिला आहे. हुर्रियत कॉन्फरन्सचे हे नेते खुलेआम पाकिस्तानातही जात असतात.