मराठा आरक्षण: ...तर तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नाही

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा इशारा

Updated: Nov 27, 2018, 05:06 PM IST
मराठा आरक्षण: ...तर तो पर्यंत आझाद मैदान सोडणार नाही title=

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले मराठा आरक्षण विधेयक येत्या २९ तारखेला सभागृहात मांडले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी मराठा आरक्षणाच्या कायदेशीर अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीची बैठक घेतली. २९ तारखेला विधेयक मांडून मराठा समाजाच्या आरक्षणसाठी कायदा मंजूर करण्याचं सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तरीही जोपर्यंत घटनेच्या निकषांवर टिकणारा कायदा पास होणार नाही, तोवर आझाद मैदान सोडणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला आहे.

मराठा क्रांती मोर्चानं राज्यभरातील कार्यकर्त्यांसह संवाद यात्रेच्या झेंड्याखाली विधीमंडळावर धडकण्याचा कार्यक्रम आखला होता. पण राज्यातून येणाऱ्या विविध कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानिक पातळीवर स्थानबद्ध केलं. त्यामुळे आझाद मैदानावर बहुतांश कार्यकर्ते पोहचूच शकले नाहीत.

कार्यकर्त्यांना मोर्चाला येण्यापासून रोखणं ही सपशेल दडपशाही असल्याचा आरोप क्रांती मोर्चाच्या मुंबईतील समन्वयकांनी केला. त्याचप्रमाणे जोवर कायदा मंजूर होत नाही, तोवर आझद मैदान सोडणार नाही असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.