मुंबई : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केलीय. याबाबत शिवसेना येत्या 2 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
कोविंद यांच्या नावाबाबत शाह यांनी उद्धव यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याचंही राऊत म्हणालेत.
राष्ट्रपती निवडणुकीबाबत काँग्रेसचा निर्णय 22 तारखेला होणार आहे.
त्या दिवशी सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार असून त्यावेळी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करायचा, याचा निर्णय घेतला जाईल असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं.
त्याच वेळी नावावर आधी चर्चा केली जाईल, हे आश्वासन भाजपानं पाळलं नसल्याची टीकाही आझाद यांनी केलीये.
राष्ट्रपतीपदाच्या नाव निश्चितीसाठी आज झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाचे भाजपचे उमेदवार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
कोविंद यांच्या नावाची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली. कोविंद हे दलित समाजाचे आहेत. ते मुळचे कानपुर, उत्तर प्रदेशचे आहेत. मागील ३ वर्षापासून ते बिहारचे राज्यपाल आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला अमित शाह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू हे दिग्गज नेते उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना देण्यात आले होते.