कृष्णात पाटील, मुंबई : आज एक व्यक्ती मातोश्रीवर आली आणि राजकीय वर्तुळामधल्या सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. या व्यक्तीनं मातोश्रीवर जाऊन नेमकं काय केलं, याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. नवरदेव आणि वऱ्हाडी तुम्हीच आहात, ठरलेलं लग्न कशाला मोडता. असा संदेश देऊन ही व्यक्ती मातोश्रीवरुन परत फिरली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत 'अब की बार... मोदी सरकार' असं मतदारांच्या मनात ठसवणारे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर सध्या जेडीयूचे उपाध्यक्ष असले तरी त्यांची खरी ओळख निवडणूक रणनितीकार अशीच आहे. त्यामुळेच प्रशांत किशोर मातोश्रीवर पोहोचताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. उत्सुकता होती या भेटीमागचं सत्य जाणून घेण्याची.
विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा सुरू असताना काही वेळ आदित्य ठाकरे यांनाही वगळण्यात आलं होतं. मातोश्रीवरच्या भेटीत प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या.
शिवसेना मोठा पक्ष आहे, मी सामान्य आहे. जे करायचं ते तुम्हालाच करायचं आहे. मी फक्त गर्दीतला एक चेहरा असणार आहे. नवरदेव आणि वऱ्हाडी तुम्हीच आहात. अवघ्या काही जागांसाठी सगळं लग्न कशाला मोडताय? कुणाचा काय फायदा आहे, ते तुम्ही बघा. जर २४-२४ चं जागावाटप होत असेल तर वाईट काय आहे? बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुम्ही पक्षाचा चेहरा आहात.
युती झाली तर आणि युती झाली नाही तर कुणाला किती जागा मिळणार, याचं गणित झी २४ तासनं याआधीच केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलं होतं. या दोन्हींची तुलना करता युती झाल्यास दोन्ही पक्षांचा फायदा आहे, हे अगदी स्पष्ट दिसतं आहे.
प्रशांत किशोर यांना मातोश्रीवर पाठवून भीती दाखवून युती करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. या भेटीनंतर युतीबद्दल संजय राऊतांचं सूचक मौन बरंच काही सांगणारं आहे. आता प्रशांत किशोर यांच्या सांगण्यानुसार शिवसेना मुंडावळ्या बांधून लग्नासाठी तयार होणार की थोड्याशा जागांसाठी लग्न ठरता ठरता मोडणार, याची उत्सुकता आहे.