Political Breaking News : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं सोशल मीडियापासून इतर सर्वच ठिकाणी या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. या साऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातून मात्र एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीमुळं आता राजकारणाच नेमकी कोणती समीकरणं डोकं वर काढतात हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आमदार नवाब मलिक यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त X या समाज माध्यमावरून दिलेल्या शुभेच्छांवरून वादंग माजण्याची चिन्ह आहेत. मलिक यांनी आपल्या एक्स हँडल वरून शुभेच्छा देताना आपल्या फोटोसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचं चिन्ह असणारं घड्याळ चिन्हं फोटोमध्ये दाखवल्याने अनेकांच्याच भुवया उंचावल्या असून, ते अजित पवारांसोबत असल्याचे संकेत समजले जात आहेत.
आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
Happy Independence Day!#IndependenceDay #Independence pic.twitter.com/A4fg1irMVG
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 15, 2024
नवाब मलिक यांची नवी सोशल मीडिया पोस्ट पाहता ते अजित पवार यांच्यासोबतच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यापूर्वी अजित पवारांच्या ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये मलिक दिसत होते. विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याहीवेळी नवाब मलिक अजित पवारांसोबत दिसले होते. असं असलं तरीही मलिकांच्या अजित पवार यांच्यासमवेत जाण्यानं भाजप आणि अजित पवार गट यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक सोबत नको अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांची नेमकी भूमिका काय आणि त्याचा महायुतीवर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवाब मलिक यांनी आतापर्यंत आपण कोणत्या गटासोबत आहोत यासंदर्भातील स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडलेली नसली तरीही त्यांनी आता सोशल मीडिया पोस्टमधून संकेत दिले आहेत हे मात्र स्पष्ट होत आहे.
मलिक जामिनावर बाहेर आले तेव्हा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून सातत्यानं त्यांच्यासोबत भेटीगाठी केल्या जात होत्या. पण, नवाब मलिक कुठे जाणार हे मात्र स्पष्ट होत नव्हतं. आता मात्र हे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी 'झी24तास'सोबत संवाद साधताना लक्षवेधी प्रतिक्रिया दिली.
'एक लक्षात घ्या, आमच्या हवंनकोचा प्रश्न नाही. नवाब मलिक स्वतंत्र असून त्यांना स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार आहे. कोणत्या पक्षासोबत जावं, कोणतं चिन्हं घ्यावं?, कोणत्या नेत्यांसोबत रहावं हा सर्वस्वी त्यांचाच प्रश्न आहे. त्यामुळं घड्याळ त्यांना हवं आहे... या आणि अशा गोष्टींचा प्रश्न त्यांचा आणि त्यांच्या नेतृत्त्वाचा आहे', असं दरेकर म्हणाले. महायुती ही पक्षाशी असून, ती एखादा उमेदवार किंवा एखाद्या विभागाशी नसून पक्षांतर्गत गोष्टी हा अंतर्गत विषय आहे ही बाब अधोरेखित करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी महायुती आहे असं ते म्हणाले.