मुंबई : मुंबईतल्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. आंदोलक शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर हा लाठीचार्ज झाल्याचं सांगण्यात येत आहे. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचं सरकारनं मान्य केले होतं मात्र त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही.
शिक्षकांवरील लाठीचार्जचा शिक्षक संघटनांक़डून निषेध करण्यात आला आहे. उद्या शिक्षक काळी फीत बांधून काम करणार आहेत. लाठीचार्ज केलेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. मागील १८ वर्षाहून या शिक्षकांच्या मागण्या अपूर्ण आहेत. या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य सरकारने केले होते.