अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: पोलिसांना सुविधा मिळत नाहीत, असे गार्हाणे मांडणार्या वाशीम जिल्ह्यातील पोलिस हवालदार संजय घुले यांना शिक्षा म्हणून केलेली बदली तत्काळ रद्द करण्याची विनंती माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून केली आहे.
या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कोरोनाशी लढताना आपल्या पोलीस स्वत:चा जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाशी लढताना आतापर्यंत राज्यातील सुमारे 2300 हून अधिक पोलिस जवान कोरोनाग्रस्त झाले आहेत. अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशात पोलिसांनी केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा केली, तर त्यांना शिक्षा म्हणून बदली करणे, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल खच्ची करणारे आहे.
खोकला आणि शिंका आल्यामुळे अटक झालेल्या भाजप नेत्याला पोलिसांनी सोडले
मी मुंबई ते नागपूर असा परतीचा प्रवास करताना 17 मे रोजी वाशीम जिल्ह्यातील जऊळका पोलिस स्थानक, किन्हीराजा पोलीस दलातील हवालदार श्री संजय घुले यांची मार्गात भेट झाली होती. त्यांची विचारपूस केली असता सॅनेटायझर किंवा मास्क यापैकी कोणत्याही प्राथमिक सुविधा त्यांना मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. कुणीतरी या घटनेचा व्हीडियो काढून व्हायरल केला.
यानंतर 28 मे रोजी पोलिस अधीक्षकांनी घुले यांची किन्हीराजा येथून वाशीम जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या धनज येथे बदली केली. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून बदलीचे ठिकाण हे सुमारे 140 कि.मी. अंतरावर आहे. केवळ प्राथमिक सुविधांची अपेक्षा करणार्या पोलिसाची शिक्षा म्हणून अशी दूरच्या अंतरावर बदली करणे, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. आधीच पोलिस दल व्यथित असताना या घटनेने पोलीस दलात संतापाची भावना निर्माण झाल्याचे फडणवीसांनी पत्रात म्हटले आहे.