'तुझा व्हिडीओ बघायला तू काय...' पोलिसाच्या पत्नीने नितेश राणेंना झापलं!

MLA Nitesh Rane Controversy: नितेश राणेंच्या वक्तव्याविरोधात पोलीस पत्नींनी मिळून यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Feb 25, 2024, 10:13 AM IST
'तुझा व्हिडीओ बघायला तू काय...' पोलिसाच्या पत्नीने नितेश राणेंना झापलं!  title=
Police Wife On Nitesh Rane

MLA Nitesh Rane Controversy: पोलीस व्हिडीओ काढून काय करणार? घरी जाऊन पत्नीला माझे व्हिडीओ दाखवणार, अशा आशयाचे विधान नितेश राणेंनी जाहीर सभेतून केले होते. या वक्तव्याचा पोलीस कुटुंबियांकडून निषेध केला जात आहे. त्यामुळे नितेश राणेंना ते वक्तव्य भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलीस पत्नींनी मिळून यासंदर्भात आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. 

नितेश राणे जाहीर सभेत पोलिसांबद्दल बरळत असतात. नितेश राणेंनी पोलीस आणि पोलीस कुटुंबियांची जाहीर माफी मागावी. आम्ही यासंदर्भात सीपी साहेबांना निवेदन दिले आहे. केवळ पोलीसच नव्हे तर पोलिसांच्या पत्नींनाही त्यांनी अपमानित केल्याचे पोलीस पत्नींनी म्हटले. कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. नितेश राणे यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांची लेखी माफी मागावी अशी मागणी पोलीस कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. 

पोलीस खात्यावर तुमचा दबाव?

आमचं राज्य आहे. पोलीस आमचं काय करणार? असे ते जाहीर सभेत म्हणतात. पोलीस व्हिडीओ काढतात. ते घेऊन काय करणार? जाऊन बायकोला दाखवतात. तुझे व्हिडीओ बघायला तू काय हिरो आहेस का? लोकप्रतिनीध असा बोलतोय तर उद्या पब्लीक काय बोलेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पोलीस व्हिडीओ करतात, तो त्यांच्या ड्युटीचा भाग आहे. त्यांचा रेकॉर्डला ते ठेवत असतात. तुम्ही संविधान मोडताय. पोलीस खात्यावर तुमचा दबाव सुरु आहे का? असा प्रश्नही त्यांनी नितेश राणेंना विचारला. 

तू आहेस केवढा? बोलतोस किती? पायाखाली स्टूल घेऊन भाषणाला उभा राहतोस आणि पोलिसांबद्दल बोलतोस? अशी टीका पोलीस पत्नींनी राणेंवर केली. 

दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. महिलांचा अपमान कुठे केला विचारणाऱ्या भाजप आमदारा विरोधात पोलिसांच्या पत्नींनी आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिली. 

काय म्हणाले वडेट्टीवार?

भाजप आमदार सतत पोलिसांचे खच्चीकरण करतात, त्या पुढे जाऊन त्यांच्या पत्नीबद्दल बोलतात.कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा आज पोलिसांच्या पत्नींना द्यावा लागतो. ह्यातून राज्यात पोलिसांची आणि कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे राज्यातील जनतेला दिसत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. 

ज्या राज्यात पोलिसांच्या पत्नींना खालच्या भाषेत सत्ताधारी भाजप आमदार बोलत असतील तिथे इतर महिलांची सुरक्षा आणि सन्मानाबाबत काय स्थिती असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.