मुंबई : आयुष्याची कमाई हातातून निघून गेल्याने पीएमसी खातेधारक हवालदिल झालेत. पैसे कधी मिळतील या चिंतेने पीएमसी खातेधारकांची दिवाळी अंधारात गेलीय. सर्व खातेदारांनी मुंबईच्या बीकेसीतील आरबीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
पीएमसी बँक खातेधारक आज पहाटेपासूनच आरबीआय कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे. खातेदारांनी पीएमसी बँकेच्या बंदीविरोधात घोषणाबाजी करीत रस्त्यावर बसले होते. दरम्यान, खातेदारांचे एक शिष्टमंडळ आरबीआय अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी गेले. दोन तास बैठक झाली. आरबीआयने पीएमसी बँकेच्या खातेदारांना काही आश्वासन दिले आहे. दरम्यान, आरबीआयने दिलेल्या आश्वासनामुळे खातेदार पूर्णपणे समाधानी झालेले नाहीत.
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक गैरव्यवहारामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. या बँकेमुळे देशातील १७ लाख खातेदार अडचणीत आले आहेत. अर्थात १७ लाख कुटुंब आहेत. या कुटुंबांच्या आर्थिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बँकेत पैसे अडकल्याने आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे.
आता आरबीआय काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. उद्या आरबीआयची बैठक होणार आहे. त्यामुळे या बँकेच्या भवितव्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच पतसंस्थांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळे अनेक पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. सामान्य लोकही पैसे नसल्याने हतबल झाले आहेत.