मुंबई : काँग्रेस राष्ट्रवादीच्य़ा नेतृत्वानं सत्तेत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलंय. तरीही आघाडीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडून शिवसेनेला चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं शिवसेना विरोधकांच्या रणनीतीला बळी पडते की काय हे पाहावं लागणार आहे.
सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्यावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये तू तू मै मै सुरू आहे. महायुतीचा दुसऱ्यांदा संसार होणार की नाही अशी शंका असताना विरोधक मात्र शिवसेनेचा पारा कसा चढेल याची काळजी घेताना दिसतायत. शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात बसणार असं जाहीर केलंय. तरीही काँग्रेस राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतले नेते शिवसेना नेत्यांना चावी देण्याचं काम करतायत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्यना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार नाही असंच सांगून टाकलं.
अशी काडी करण्यात तर नवाब मलिकांचा हात कोण धरणार?. शिवसेनेनं पाठिंबा न दिल्यास सरकार कोसळलं तसं झालं तर राष्ट्रवादी पाठिंब्याचा विचार करेल असं वक्तव्य नवाब मलिकांनी केलं आहे.
महायुतीच्या संसारात जेवढे बिब्बे टाकायचे तेवढे बिब्बे टाकण्याचं काम विरोधक करत आहेत. आता विरोधकांच्या चिथावणीला शिवसेना बळी पडते की काय हे येत्या दिवसात स्पष्ट होईल.