मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानात त्यांनी देशवासियांनी घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. यावर आता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयाने पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अभियानाला गती मिळणार आहे.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येतोय. या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई महापालिकेने शहरातील रहिवासी आणि संस्थांना 50 लाख राष्ट्रीय ध्वज वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत एक सविस्तर मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
समिती स्थापन
मिड डेच्या वृत्तानुसार, शहरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवण्यासाठी बीएमसीने एक समितीही स्थापन केली आहे. बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही शुक्रवारी यासंदर्भात बैठक घेतली. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार प्रभाग अधिकारी 35 लाख तिरंगा घरे आणि इतर संस्थांना वाटप करणार आहेत.
नागरीकांना स्वतःचा तिरंगा विकत घेण्यासाठी आणि घरोघरी फडकवण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान मरीन ड्राईव्हवर लेझर शो आयोजित असणार आहे. तसेच शाळा, कार्यालये, रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि बचत गटांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देशही दिले.
अभियान काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरोघरी राष्ट्रध्वज फडकवून 'हर घर तिरंगा' मोहिमेला बळ देण्याचे आवाहन केले. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे मोदी यांनी ट्विट करून म्हटले होते.