मुंबई : कोरोनाबाधितांसाठी परळच्या केईएम रूग्णालयात प्लाझ्मा बँक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महागड्या इंजेक्शन्सचा खर्च टळणार आहे. तसेच दात्यांकडून सामाजिक बांधिलकीही जपली जाणार आहे. कोरोनामुक्त रूग्णांच्या शरिरातील रक्तातून अँटीबॉडीज मिळवून त्याचा वापर कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी करण्यात येत आहे.
मध्यम आणि तीव्र स्वरूपाची लक्षणं असलेल्या रूग्णांसाठी ही प्लाझ्मा थेरपी जीवनदान देणारी ठरत आहे. पालिकेच्या नायर, सायन, केईएम रूग्णालयात प्लाझ्मा केंद्र सुरू करण्यात आलं होतं. पण या ठिकाणच्या मर्यादीत क्षमतेमुळे गरजू रूग्णांना आवश्यक त्या प्रमाणात प्लाझ्मा उपलब्ध होण्यासाठी केईएममध्ये आता प्लाझ्मा बँकच सुरू करण्यात येत आहे.
येत्या दोन आठवड्यात ही प्लाझ्मा बँक सुरू होईल अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यामुळे महागड्या टॉसिलिझुमॅब आणि रेमडेसिवीर या इंजेक्शन्ससाठी गोरगरीबांचा खर्च वाचेल. अवघ्या साडेसात हजारात उपलब्ध होणारी प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरणार आहे.