दीपक भातुसे, मुंबई : राज्य सरकारकडून अनलॉकमध्ये हळूहळू शिथिलता आणली जात आहे. आता राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीला वाहतुकीची परवानगी मिळाली आहे. फक्त एसटी बसेसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. आता एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटीने प्रवास करता येणार आहे.
याआधी राज्यातील उद्योग, व्यापार, दुकाने सुरू केले गेले आहे. पण शहरी भागातून ग्रामीण भागात होणारा संसर्ग टाळावा, राज्यात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर फक्त शेतीमाल, औद्योगिक तसेच इतर माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. नागरिकांना मात्र अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. एसटी सेवा ही जिल्हांतर्गत सुरू होती. पण आता एसटी ही दुसऱ्या जिल्ह्यात ही जाणार आहे.
पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या शहरांतून नागरिक आपल्या मूळ गावी जात आहेत. पण यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका ही वाढेल. त्यामुळे सरकारने जिल्हाबंदी कायम ठेवली होती. काही अत्यावश्यक कामाशिवाय कोणालाही जाण्यासाठी परवानगी नव्हती. पण आता एसटीने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार आहे. खासगी वाहनांना ईपास मात्र आवश्यक असणार आहे.