अंत्यविधीला उपस्थित न राहिल्याने कुटुंबावर टाकला बहिष्कार

बऱ्याचदा ग्रामीण भागात अनुभवास येणारी सामाजिक बहिष्काराची अनिष्ट प्रथा आता मुंबईतही दाखल झालीय. त्याबाबतची एक केस पहिल्यांदाच दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालीय.  

Updated: Jul 21, 2017, 10:22 PM IST
 title=

मुंबई : बऱ्याचदा ग्रामीण भागात अनुभवास येणारी सामाजिक बहिष्काराची अनिष्ट प्रथा आता मुंबईतही दाखल झालीय. त्याबाबतची एक केस पहिल्यांदाच दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल झालीय.  

दादर पश्चिमेला राहाणारे ज्येष्ठ नागरिक प्रभाकर भोसले यांनी त्यांच्या समाजाच्या जात पंचायतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केलीय. घडशी समाजाने गेल्या 10 वर्षांपासून आपण तसेच कुटुंबीयांना बहिष्कृत केल्याचा भोसले यांचा आरोप आहे. 

समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीला उपस्थित न राहिल्याचा राग आपल्यावर काढला जात असल्याचं भोसले यांचं म्हणणं आहे. त्यानुसार आज शिवाजी पार्क पोलिसांनी भोसले यांची तक्रार नोंदवून घेत घडशी समाजाच्या जात पंचायतीतील 9 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समिती भोसले यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीय. समितीच्या मुक्ता दाभोलकर आणि कायदातज्ज्ञ पदाधिकारी तक्रार दाखल करताना भोसले यांच्यासोबत होते. या प्रथेचा निषेध व्यक्त करीत भोसले यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरणाचा पाठपुरावा समिती करणार आहे.