आयकर विभागाच्या टार्गेटवर पवार कुटुंब? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बदल्यांसाठी, निविदांसाठी 1000 कोटींची दलाली, देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

Updated: Oct 9, 2021, 08:52 PM IST
आयकर विभागाच्या टार्गेटवर पवार कुटुंब? देवेंद्र फडणवीस म्हणाले... title=

मुंबई : Income Tax Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांची सलग तीन दिवस आयकर विभागाच्या (Income Tax) अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. कोल्हापूर, पुणे, बारामती, अहमदनगरमध्ये छापेसत्र टाकण्यात आलं. यानंतर आयकर विभागाने पवार कुटुंबाला टार्गेट केलं आहे का असे सवाल उपस्थित केले जात होते.

खरेदीच पैसा योग्य पाहिजे

यावर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काल परवा जे छापे झाले आहेत. पाच साखर कारखाने ज्यांच्या विक्रीच्या संदर्भात तक्रार होती, त्याची चौकशी झाली, चौकशीमध्ये विक्रीची प्रक्रिया ही चुकीची आहे, आणि त्याही पेक्षा विकत घेतानाचे जे फंडस आले आहेत, ते फंडस चुकीच्या पद्धतीने आले आहेत. तुम्ही काळ्या पैशावर टॅक्स भरून किंवा लाचेचा जो पैस असतो त्याच्यावर टॅक्स भरून तो पांढरा करु शकत नाही, हा नियम आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एखादा कारखाना विकत घेता, त्यावेळी त्या कारखान्याचा जो खरेदीचा पैसा आहे हा योग्य असला पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पवार कुटुंबात अजून लोकं आहेत

पण तक्रारी अशा होत्या या कारखान्यांच्या खरेदीच्यावेळी ज्या कंपन्यांमधून पैसा आलेला आहे तो पैसा योग्य नाही, त्यामुळे याची चौकशी आयकर विभागाने केली आहे. आणि त्यानतंर या कंपन्यांचे जे संचालक होते, त्या संचालकांकडे हा छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांवर छापा टाकला हे म्हणणं चुकीचं आहे, कारण पवार कुटुंबात अजून लोकं आहेत. ते वेगवेगळे व्यवसाय करत आहेत, त्यांच्यावर कोणताही छापा टाकण्यात आलेला नाही. हे चार पाच जे काही साखर कारखाने आहेत, ज्यात काही व्यवहार झाले याची माहिती आयकर विभागाकडे होती, त्याच्या संचालकांवर टाकलेले हे छापे होते, त्याला कोणत्याही परिवाराशी जोडून पाहणं अयोग्य आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

1 हजार 50 कोटी रुपयांची दलाली

दोन प्रकारचे छापे आयटी विभागाने टाकले आहेत. त्यातल्या पहिल्या छाप्याच्या संदर्भात त्यांनी प्रेस नोट काढली आहे, जी अत्यंत गंभार आहे. कारण एक हजार 50 कोटी रुपयांची दलालीची कागदपत्र सापडली आहेत. त्याचे पुरावे सापडले आहेत. त्यात बदल्या आहे, टेंडर आहेत, ज्यात मंत्री आहेत, अधिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नव्हे तर देशातला सर्वात मोठा पुरावा या छाप्यांमध्ये सापडला आहे. एजन्सी याबाबत अधिक खुलासा करेल त्यावेळीच आपल्याला अधिक माहिती कळेल. पण हे अत्यंत गंभीर आहे, अशा प्रकारच्या छाप्यांनंतर, पुरावा मिळाल्यानंतर त्याला राजकीय स्वरुप देणं, हे चुकीचं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.