परखड बाबासाहेब ४ | मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी फेटाळता येणार नाही, हे बाबासाहेबांनी असं मांडलं

विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेली सडेतोड आणि तर्कसंगत उत्तरे यांचा गोषवारा...     

Updated: Apr 14, 2022, 10:14 PM IST
परखड बाबासाहेब ४ |  मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी फेटाळता येणार नाही, हे बाबासाहेबांनी असं मांडलं title=

मुंबई : भाषावार प्रांतरचना करताना मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाऊ नये, अशा प्रकारचा युक्तिवाद तत्कालीन विचारवंतांनी (विशेषतः प्रोफेसर सी. एन. वकील, प्रा. दातवाला आणि प्रा. घीवाला यांनी) केला होता. यावर मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे? याचे सर्वात प्रभावी आणि परखड विवेचन केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी.

- आक्षेप : ‘मुंबईतील गुजराती भाषिकांनी मुंबईचा व्यापार आणि उद्योगधंदा उभा केला. महाराष्ट्रीय केवळ कारकून आणि हमाल राहिले. महाराष्ट्रीय नावाखाली येणाऱ्या या कामगार वर्गाच्या राजकीय वर्चस्वाखाली व्यापार-उद्योगाच्या मालकांना राहू द्यावे हे चुकीचे ठरेल.'

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर खाली वाचा :

"मुंबईचा व्यापार-उद्योग कोणी उभा केला, याबाबत फार मोठया संशोधनाची गरज नाही. मुंबईचा व्यापार-उद्योग गुजरात्यांकडून उभारला गेला, या म्हणण्याला खरे तर काहीच आधार नाही... तो युरोपियनांकडून उभारला गेला, गुजरात्यांकडून नाही. गुजराती हे केवळ व्यापारी होते. हे उद्योगपती असण्यापेक्षा वेगळे आहे.

"...व्यापार-उदीम गुजरात्यांच्या मालकीचा आहे हा युक्तिवाद मांडून मुंबई महाराष्ट्रात विलीन करण्याची मागणी फेटाळता येणार नाही. गहाण ठेवून घेतलेल्या जमिनीवर कायमस्वरुपी बांधकाम केले आहे अशी सबब पुढे करून गहाण ठेवणाऱ्याने जमिनीच्या परताव्यासाठी केलेली मागणी, गहाण ठेवून घेणारा धुडकावून लावू शकत नाही...

"बिहारमध्ये ज्या जमिनीत कोळसा सापडला ती जमीन बिहारी लोकांच्या मालकीची आहे. कोळशाचे मालक मात्र लोक गुजराती, काठेवाडी आणि युरोपियन आहेत. तेथील बिहारी लोक गुजराती आणि काठेवाडी कोळसा मालकांबाबत भेदाभेद करण्याची शक्यता नाही काय? या गुजराती आणि काठेवाडी कोळसा उद्योजकांच्या हितार्थ बिहारचे कोळसा क्षेत्र बिहार प्रांतापासून वेगळे करून स्वतंत्र प्रांत स्थापणार काय?"

(संदर्भ : महाराष्ट्र : एक भाषिक राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली राज्य पुनर्रचना आयोगापुढे सादर केलेले निवेदन).