परखड बाबासाहेब १ | मुंबई महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता, या आक्षेपावर बाबासाहेबांचा युक्तिवाद

मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाऊ नये, यावर तत्कालीन विचारवंतांचा आक्षेप होता, याविरोधात राज्य पुनर्रचना आयोगासमोर बाबासाहेबांनी केलेला परखड आणि प्रभावी युक्तीवाद वाचा.

Updated: Apr 14, 2022, 09:12 PM IST
परखड बाबासाहेब १ | मुंबई महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता, या आक्षेपावर बाबासाहेबांचा युक्तिवाद title=

मुंबई : भाषावार प्रांतरचना करताना मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट केली जाऊ नये, अशा प्रकारचा युक्तिवाद तत्कालीन विचारवंतांनी (विशेषतः प्रोफेसर सी. एन. वकील, प्रा. दातवाला आणि प्रा. घीवाला यांनी) केला होता. यावर मुंबई ही महाराष्ट्रातच का राहिली पाहिजे? याचे सर्वात प्रभावी आणि परखड विवेचन केले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दिलेली सडेतोड आणि तर्कसंगत उत्तरे यांचा गोषवारा... 

- आक्षेप : 'मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता'

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उत्तर खाली वाचा :

"महाराष्ट्र प्रांताच्या संदर्भात मुंबईचे स्थान लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र प्रांताची रचना झाल्यास तो आकाराने त्रिकोणी असेल. या त्रिकोणाची एक बाजू ही उत्तरेकडील दमण आणि दक्षिणेकडील कारवार यांमधील भारताची पश्चिम किनारपट्टी आहे.

मुंबई शहर हे दमण आणि कारवारच्या मध्यावर पडते. गुजरात प्रांत दमणपासून पुढे उत्तरेकडे पसरतो. कन्नड प्रांत कारवारपासून पुढे दक्षिणेकडे पसरतो... जर दमण आणि कारवारमधील अखंड प्रदेश भौगोलिकदृष्टया महाराष्ट्राचा भाग ठरतो तर फक्त मुंबईच महाराष्ट्राचा भाग का बरे होऊ शकत नाही ? ही निर्विवाद नैसर्गिक वस्तुस्थिती आहे.

भूगोलाने मुंबईला महाराष्ट्राचा हिस्सा ठरविले आहे. जे या नैसर्गिक तथ्यालाच आव्हान देऊ इच्छितात त्यांना ते करू द्यावे. मात्र, निःपक्षपाती बुद्धी याच निष्कर्षात येते की मुंबई महाराष्ट्राचीच आहे."

( संदर्भ : महाराष्ट्र : एक भाषिक राज्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४८ साली राज्य पुनर्रचना आयोगापुढे सादर केलेले निवेदन )