विरार : विरारचा पापडखिंड धरण धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय. शहराबाहेर न जाताही पावसाचा मनमुराद आनंद सहज घेता येत असल्यानं हा छोटेखानी धबधब्यावर सध्या चांगलीच गर्दी होतेयं..पण या धबधब्यावर येत काही तरुणांनी हुल्लडपणा केलायं...मद्यपान करून हे तरुण डोंगराच्या टोकावर जात असल्यानं दरड कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झालीये...त्यामुळे पर्यटकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. पापडखिंड धरणाच्या पाण्यात मागच्या वर्षात अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यात.. त्यामुळे यावर्षी पाण्यात कोणी उतरू नये यासाठी महापालिकेचे दोन सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. पण तरी मद्यपी हुल्लडबाजांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
मोठी कसरत करून हे तरुण डोंगराच्या टोकापर्यंत पोहचले. इथं जाऊन या तरुणांनी मद्यपानासहीत पार्टी केली. निसर्ग रम्य वातावरण, हिरवेगार डोंगर, पाण्याचे ओहोळ आणि मित्रांना एकत्र येण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणून विरार पूर्वेकडील पापडखिंड परिसर सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. सुट्टीच्या दिवशी अथवा पावसामुळे रेल्वे सेवा बंद असल्यास या धबधब्यावर विरारकरांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र येथे मद्यपान करून सुरु झालेल्या तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा मात्र हिरमोड झाला.
पावसाळ्याचे दिवस असल्याने डोंगरावरील दगडही निसरडे झालेले असतात. त्यात हे तरुण डोंगराच्या टोकापर्यंत टोळक्याने जातात. अशात एखादा दगड कोसळून किंवा हेच तरुण खाली कोसळल्यास जीवावर बेतणार आहे.