पंकजा मुंडे मातोश्रीच्या संपर्कात - सूत्र

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडेंचा उल्लेख 

Updated: Dec 2, 2019, 02:00 PM IST
पंकजा मुंडे मातोश्रीच्या संपर्कात - सूत्र  title=

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारपासून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. याला कारण आहे त्यांची फेसबुक पोस्ट. थोडं अलिप्त राहून लवकरच राजकारणाची दिशा ठरवणार असल्याचं सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे राजकारणापासून दूर आहेत. मात्र आता भाजप नेत्या पंकजा मुंडे मातोश्रीच्या संपर्कात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की, पंकजा मुंडे मातोश्रीच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांच्या फेसबुक पोस्टने ही गोष्ट अधोरेखित केली आहे. तसेच ट्विटरवरून देखील त्यांनी भाजपची ओळख पुसून टाकली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी लिहीलेल्या पोस्टमुळे त्या राजकारणात मोठा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट झाल आहे. (पंकजा मुंडे घेणार का अनपेक्षित निर्णय?) 

भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबधांमुळे पंकजा मुंडे यांनाही मातोश्रीने कधीच अंतर दिले नाही. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना झाला त्यावेळी देखील शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंकजा मुंडे यांना बहिण माणून त्यांच्या विरोधात परळीमधून उमेदवार दिला नाही. तसेच प्रितम मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीतही बीड जिल्ह्यातील शिवसेनेची सर्व फौज त्यांच्या पाठीशी उभी केली होती. त्यामुळे पंकजा आणि प्रितम यांच्याशी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरही मातोश्रीने कौटुंबीक जीव्हाळा कायम ठेवला. (पंकजा मुंडेंच्या ट्विटरवरून 'भाजप' गायब)

तसेच संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधतेवेळी पंकजा मुंडे यांच्याही पुढील वाटचालीविषयी सूचक वक्तव्य केलं. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करत त्यांच्या राजकीय भूमिकेविषयीची एक लक्षवेधी पोस्ट केली होती. ज्यानंतर आता त्यांनी ट्विटर अकाऊंटवर देण्यात आलेल्या माहितीतूनही त्यांनी भाजपचा उल्लेख काढला आहे. त्यामुळे आता भाजपवर असणारी त्यांची नाराजीच त्यांच्या या कृत्यांतून स्पष्ट होत आहे. याचविषयी विचारलं असता राऊत यांनीही १२ डिसेंबरलाच पंकजा मुंडे यांच्याविषयी कळेल असं वक्तव्य केलं. (पंकजा मुंडे काय करणार? संजय राऊतांचं सूचक वक्तव्य)

आता पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत परळी मधून पराभव झाल्यानंतर हा पराभव भाजप पक्षाअंतर्गत असलेल्या राजकारणामुळेच झाल्याचं ठाम विश्वास पंकजा मुंडे समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे येत्या १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना भाजपला सोडचीठ्ठी दिल्यास कौटुंबीक नात्यामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे.