'सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार'

एकीकडे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए घोटाळ्याचे आरोप होत असतानाच आता विरोधकांनी त्यांचा मोर्चा उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे वळवला आहे.

Updated: Aug 8, 2017, 05:10 PM IST
'सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार' title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : एकीकडे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एसआरए घोटाळ्याचे आरोप होत असतानाच आता विरोधकांनी त्यांचा मोर्चा उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडे वळवला आहे. सुभाष देसाईंच्या खात्यामध्ये हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.

उद्योगमंत्र्यांनी ३१ हजार ५० एकर जमीन एमआयडीसीमधून बेकायदा वगळली. उद्योगमंत्र्यांनी ५० हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अजित पवारांनी केला. शेतकऱ्यांनी मागणी केली असती आणि जमीन वगळली असती तर ते योग्य होते, पण स्वस्तिक बिल्डर अर्ज करतो आणि जमिनी वगळल्या जातात, असं अजित पवार म्हणाले.

नारायण राणे उद्योगमंत्री असताना असा अर्ज आला होता, पण त्यांनी जमीन वगळली नव्हती, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. तसंच एकनाथ खडसे एमआयडीसी जमिनीबाबत माहिती मागत असताना सरकार ती माहिती देत नाही, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं.

दरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही जो निर्णय घेतला तो योग्य असल्याचं सुभाष देसाई म्हणाले. विरोधकांनी मात्र आता प्रकाश मेहतांबरोबरच सुभाष देसाईंच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.