मुंबई : कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी केली होती. हा निर्णय घेऊनही मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरात कांद्याच्या दरांनी साठी पार केली आहे. नाशिक आणि पुणे येथील बाजारसमितीत आवक मंदावल्याने कांद्याच्या दरात आठवडाभरात किलोमागे १० रुपयांची वाढ झाली आहे.
अन्य भाजीपाला ६० ते ८० रुपयांचा आकडा पार केल्याने सर्वसामान्यांचे सामान्य आर्थिक गणित कोलमडले आहे. परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी कांदा चाळीत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. कांदा दरवाढची परिस्थिती डिसेंबर अखेरपर्यंत अशीच राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
कांद्याचा दर नोव्हेंबरपर्यंत कमी होण्याचे संकेत मिळत होते. मात्र, परतीच्या पावसाने राज्याला झोडपडून काढले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका शेतीबरोबरच भाजीपाल्याला बसला आहे. यात कांदा पीकही सुटलेले नाही. त्यामुळे कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे बाजारात कांदा कमी प्रमाणात येत आहे. मात्र, शेतकऱ्याला कमी भाव तर दलाल मधल्यामध्ये जास्तीचे पैसे कमवत असल्याचे सांगण्यात येत आहे.