मतदानादिवशी महिलांसाठी खास सुविधा

महिलांसाठी खास सुविधा

Updated: Oct 13, 2019, 04:12 PM IST
मतदानादिवशी महिलांसाठी खास सुविधा title=
संग्रहित छाया

मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ काही दिवसांवर आली आहे. सर्व पक्षांकडून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. प्रचारादरम्यान जनतेला निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. परंतु घरात लहान मूल असल्याने मतदान करण्यात अडचण येत असल्यास महिलांसाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. महिलांनाही त्यांच्या लहान मुलांना घेऊन मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदार संघांतील १०२६ मतदान केंद्रांच्या ठिकाणी पाळणाघरांची सुविधा करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांतर्फे लहान मुलांचं संगोपन करण्यात येणार आहे. 

या सुविधेअंतर्गत प्रत्येक पाळणाघरात लहान मुलांना सांभाळण्यासाठी कमीत कमी १ अंगणवाडी सेविका आणि मतदान केंद्रांच्या संख्येनुसार एकाहून अधिक सेविकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पाळणाघरात येणाऱ्या प्रत्येक मुलाची नोंद करण्यात येणार आहे. पाळणाघराबाहेर सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात येणार आहेत.

मुलांना खेळण्यासाठी खेळणी, सुका खाऊ, पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात येणार आहे. यामुळे महिला त्यांच्या मुलांना पाळणाघरात ठेवून मतदानाचा अधिकार बजावतील.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या ७२ लाख ६३ हजार २४९ आहे. महिलांच्या संख्येतही यंदा वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ३३ लाख १५ हजार ३३६ महिला मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महिला मतदारांच्या संख्येत १.७८ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.