'ओखी'चा आंबेडकरी अनुयायांना फटका, दादर स्टेशनवर घेतला आसरा

ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली. मुंबईतलं जनजीवन यामुळे विस्कळीत झालंच पण त्याचा सर्वाधिक फटका मुंबई बाहेरून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या आंबेडकरी अनुयायांना बसला.

Updated: Dec 5, 2017, 10:22 PM IST
'ओखी'चा आंबेडकरी अनुयायांना फटका, दादर स्टेशनवर घेतला आसरा title=

मुंबई : ओखी चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली. मुंबईतलं जनजीवन यामुळे विस्कळीत झालंच पण त्याचा सर्वाधिक फटका मुंबई बाहेरून महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या आंबेडकरी अनुयायांना बसला.

भीमसैनिक नाराज

बुधवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणदिन... यानिमित्तानं मुंबईतल्या चैत्यभूमीवर दर्शनासाठी आलेल्या भीमसैनिकांची ओखी चक्रीवादळामुळं प्रचंड गैरसोय होतेय. शिवाजी पार्कमध्ये भीम अनुयायांना पावसात भिजावं लागतंय. पालिकेने शाळांची यादी जाहीर केलीय. पण शाळांना कोणतेही आदेश देण्यात आले नव्हते. त्यामुळे पालिका प्रशासनावर आंबेडकरी अनुयायी नाराज झाले.

स्टेशनवर मिळाला आसरा

भीम अनुयायी आणि राजकीय कार्यकर्ते संतापल्यावर बेस्टच्या बसेस मागवून अनुयायांना इतर ठिकाणी नेण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली. शिवाजी पार्कमध्ये पावसामुळे प्रचंड चिखल झाल्यामुळे अखेर भीमसैनिकांनी दादर रेल्वे स्थानकावर तात्पुरता आसरा घेतला.

महापौरांचा दावा

अचानक आलेल्या पावसामुळे आंबेडकरी अनुयायांची गैरसोय झाली असली तरी महापालिका सर्वतोपरी त्यांना मदत करत असल्याचा दावा मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. भीमसैनिकांच्या राहण्याची तसंच प्रत्येकाच्या जेवणाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय.

तारेवरची कसरत

अचानक बदललेल्या हवामानामुळे मुंबई महापालिका प्रशासनालाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र दरवर्षी लाखोंच्या संख्येनं भीमसैनिक या काळात येतात याचा महापालिकेला वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे अशा अचानक उदभवलेल्या परिस्थितीत काय करायला हवं याची तयारी महापालिकेने करणं गरजेचं होतं... तसं झालं असतं तर भीमसैनिकांचे झालेले हाल टाळता आले असते...