अमोल यादव आता १९ आसनी विमान निर्मिती करणार

जागेची समस्या आणि आर्थिक अडचणी हे त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गातली मोठी आव्हानं आहेत. 

Updated: Sep 18, 2017, 10:38 PM IST

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : पहिलं भारतीय बनावटीचं सहा आसनी विमान बनवून अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेणारे तरुण मराठमोळे कॅप्टन अमोल यादव, आता १९ आसनी विमान निर्मितीवर काम करत आहेत. 

विशेष म्हणजे कॅप्टन अमोल यादव यांचं हे १९ आसनी विमान, मुंबईतल्या त्यांच्या घराच्या गच्चीवरच आकार घेत आहे. मात्र जागेची समस्या आणि आर्थिक अडचणी हे त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गातली मोठी आव्हानं आहेत. 

दुसऱ्या देशांनी तयार केलेली विमानं उडवणा-या कॅप्टन अमोल यादव यांचं स्वप्न आहे ते स्वतः बनवलेलं विमान उडवण्याचं. हे स्वप्न त्यांनी स्वतः सहा आसनी विमान तयार करुन पूर्ण केलं. 

आता कॅप्टन अमोल यादव यांनी आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे ते १९ आसनी विमान बनवण्याकडे. त्यासाठी इंजिन, कॉकपीट आणि तंत्रज्ञान मिळवण्याकरता, प्रॅटन व्हिटनी, रॉकवेल कॉलिन्स या जगातल्या मातब्बर कंपन्यांशी अमोल यादवांनी करारही केले आहेत. या १९ आसनी विमानांमुळे देशातले जिल्हे विमानसेवेने जोडले जाण्याला मदत होणार आहे. 

जागेच्या अडचणीमुळे आताही अमोल यादव यांनी १९ आसनी विमान बांधणीसाठी, पुन्हा मुंबईतल्या चारकोपमधल्या राहत्या इमारतीच्या गच्चीचाच आधार घेतलाय. 

आर्थिक अडचणीं हेही अमोल यादवांपुढचं मोठं आव्हान आहे. दरम्यान अमोल यादव यांच्या मदतीसाठी, मुख्यमंत्री कार्यालय तत्पर आहे. 

अमोल यादव यांच्या नियोजनानुसार प्रत्येक गोष्ट झाली, तर येत्या जानेवारीमध्येच भारतीय बनावटीच्या पहिल्या १९ आसनी विमानाची प्रत्यक्ष हवाई चाचणी झालेली बघता येईल. यामुळे देशात हवाई क्रांती घडायला मदत होईल. 

सध्या जगभर तीनच देश १९ आसनी विमान निर्मिती करतात. अमोल यादव यांची प्रत्यक्ष विमान निर्मिती सुरू झाली तर भारत हा चौथा देश ठरणार आहे. त्यातही महाराष्ट्रात एक मराठी तरुण ही विमान निर्मिती सुरू करणार असल्याने आपल्या राज्यासाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे.