राज ठाकरेंच्या मोर्चाला अद्यापही पोलीस परवानगी नाही

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर गुरुवारी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढण्यात येणारा मोर्चा वादात सापडलाय. 

Updated: Oct 4, 2017, 08:52 PM IST
राज ठाकरेंच्या मोर्चाला अद्यापही पोलीस परवानगी नाही title=

मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर गुरुवारी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढण्यात येणारा मोर्चा वादात सापडलाय. 

मनसेच्या मोर्चाच्या पोलीस परवानगीवरून राजकीय वातावरण तापलंय. मेट्रो सिनेमा ते चर्चगेट रेल्वे स्टेशनपर्यंत मनसेचा उद्या म्हणजेच गुरुवारी पक्षाकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याचं, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. इतकंच नाही, तर आपण स्वत:ही या मोर्चात सामील होणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. 

उल्लेखनीय म्हणजे राज ठाकरेंच्या या मोर्चाला अद्याप मुंबई पोलिसांची परवानगी नाही. मनसे दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. पक्षाकडून लेखी हमी मिळाल्याशिवाय परवानगी मिळणार नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतलाय. 

शांतता भंग करणार नाही, गोंधळ घालणार नाही, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही... याची हमी देणारं लेखी पत्र पोलिसांनी मनसेला द्यायला सांगितलंय. 

यामुळे, खळ्ळखटॅकची भाषा करणाऱ्या मनसेत मोर्चाच्या परवानगीवरून पेच निर्माण झालाय. त्यातही, मोर्चा काढणारच असा निर्धार मनसेनं व्यक्त केलाय.