नेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या

NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकर लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करु शकणार आहेत. लवकरच या मार्गावरुन बसेस धावणार आहेत. किती असेल भाडे जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 13, 2024, 02:11 PM IST
नेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या title=
NMMT Bus services to be introduced across Mumbai Trans harbour link

NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. लवकर सार्वजनिक वाहतुकीतून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करता येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका अंडरटेकिंग यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर या पुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर फक्त खासगी वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लवकरच नवी मुंबई परिवहन विभागाकडून एनएमएमटी बससेवा प्रारंभ करणार आहे. एनएमएमटीचे प्रबंधक योगेश कडुस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी चार सेवांची योजना आम्ही बनवली आहे आणि दोन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस पुलावरुन धावणार आहेत. 

अटल सेतूवर बसेस किंवा बेस्ट वाहतुक सुरू व्हावी याची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा आहे. एनएमएमटी अटल सेतुवर धावणार हे वृत्त येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सेवेसाठी बस क्रमांक 155 प्रवाशांना खारकोपर बेल्ट आणि उल्वे या मार्गावरुन नेरुळ ते मंत्रालयापर्यंत असेल. 

एनएमएमटीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस क्रमांक 115 वातानुकूलित असून खारकोपर ते मंत्रालयपर्यंत आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार ही बससेवा आता नेरुळहून सुरू होईल आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे मुंबईत पोहोचेल. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नगर प्रशासनाने नेरुळ ते मंत्रालयापर्यंत 52 किलोमीटरच्या प्रवासासाठी 90 रुपये तिकिट भाडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, टोलच्या किंमतीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. कारण अधिकाऱ्यांनी अद्याप याबाबत काहीच स्पष्ट केलेले नाहीये. सार्वजनिक वाहतुक सेवांना खासगी बसच्या इतकेच टोल भरावा लागणार की त्यांना टोल शुल्क माफ केले जाणार, हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये. 

मुंबई-पुण्याचे अंतर कमी होणार

अटल सेतूमुळं मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार आहे. अटल सेतूच्या एका जोड मार्गिकेचे बांधकाम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. एप्रिल 2024 पासून या प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात होणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांना पुणे गाठणे सोप्पे होणार आहे. मुंबई ते पुणे हे अंतर अवघ्या 50-55 मिनिटांत पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण होणार आहे. तसंच, 6.50 किमीच्या मार्गासाठी साधारण 1102.75 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.