नितीन राऊतांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता- बाळासाहेब थोरात

काही विषय असतील तर आम्ही दुरुस्ती करत असतो. पण याला नाराजी म्हणणे योग्य नाही.

Updated: Jul 23, 2020, 01:25 PM IST
नितीन राऊतांनी सर्वांशी चर्चा करुन निर्णय घ्यायला हवा होता- बाळासाहेब थोरात title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील वीज कंपन्यांवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी परस्पर केलेल्या नियुक्त्या रद्द झाल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गुरुवारी मुंबईत 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी थोरात यांनी म्हटले की, नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय परस्पर घ्यायला नको होता. त्यांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे होती. सरकार तीन पक्षांचं असल्याने सर्वांशी चर्चा करुनच निर्णय घेतला जावा. त्यामुळे आता जे झालंय त्याची दुरुस्ती केली जाईल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. तसेच महाविकासआघाडीत कोणतीही नाराजी नाही. काही विषय असतील तर आम्ही दुरुस्ती करत असतो. पण याला नाराजी म्हणणे योग्य नाही, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. 

नितीन राऊत यांना स्वपक्षीयांचाच 'शॉक'; या कारणामुळे पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

नितीन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी वीज कंपन्यांवर परस्पर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डींग कंपन्यांवरील १६ सदस्यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांचाही सल्ला घेतला नव्हता. यापैकी बहुतांश सदस्य नागपूरचे होते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली होती.

'कामं होत नाहीत, मान राखला जात नाही', काँग्रेस आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

तर काँग्रेसचेही अनेक नेते नितीन राऊत यांच्यावर नाराज होते. काँग्रेसमधीलच काही नेत्यांनी नितीन राऊत यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचेही समजते. यानंतर काही तासांतच नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. नितीन राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.