मुंबई : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. भाजपने राज्यात काय केलेय. केवळ विकासाच्या गप्पा मारण्यात यांचा वेळ जातोय, अशी टीका केली होती. त्याला पुन्हा एकदा गडकरी यांनी उत्तर दिलेय.
गडकरी नेहमी विकासाच्या गप्पा मारतात. पण केवळ साबणाचे बुडबुडे सोडतात, अशा शब्दांत राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. त्याला आक्षेप घेत गडकरींनी भाजपच्या मेळाव्यात राज ठाकरेंना शिंगावर घेतलं. विकासाबाबत शिवाजी पार्कवर जाहीर चर्चेला मी तयार आहे, असं गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणालेत, टीका करणाऱ्यांना माझे आवाहन आहे. मी चर्चा करायला तयार आहे. शिवाजी पार्कवरील मैदानावर या. राज्यात ५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प आणले आहेत. रस्त्यांची कामे केलीत आणि अनेक प्रगती पथावर आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना गडकरी यांनी कामांची आणि प्रकल्पांची यादीच 'कृष्णकुंज'वर पाठवून दिली होती. आज भाजपच्या मेळाव्यात गडकरी यांनी राज यांनी पुन्हा आव्हान दिलेय.