मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन-दिवेआगार किनाऱ्यावर धडकलेले निसर्ग चक्रीवादळ चार वाजता पुण्याच्या पश्चिमेला मुंबईपासून ७५ किलोमीटर दूर होतं. हळूहळू त्याची तीव्रता कमी होणार असून वाऱ्याचा वेग कमी होत जाईल आणि नाशिक, पुणे, पालघर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.
श्रीवर्धन, दिवेआगार किनाऱ्यावर धडकलेलं निसर्ग चक्रीवादळ भूपृष्ठभागावर पुणे मुंबई मधील पट्ट्यातून पुढे सरकत जात आहे. केंद्रबिंदूपासून चक्रीवादळाचा व्यास ५० किलोमीटर इतका होता. निसर्ग चक्रीवादळाचा पसारा साधारण अडिचशे किलोमीटर इतका होता, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
Maharashtra: A team of National Disaster Response Force (NDRF) at work in Alibaug, Raigad district. #CycloneNisarga
(source: NDRF) pic.twitter.com/5KIHcrQfDT— ANI (@ANI) June 3, 2020
समुद्र किनाऱ्यावर आल्यानंतर ११० किमी वेगाने वारे वाहत होते. नंतर त्याची तीव्रता कमी झाली आणि मुंबई, ठाणे परिसरात ९० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत ६० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू लागतील आणि या भागात पाऊसही होईल, अशी माहिती कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
हे चक्रीवादळ जसं पुढे जाईल तसा त्याचा वेग कमी कमी होत जाईल. पण नाशिक, पुणे, पालघर, धुळे, नंदुरबारमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. या जिल्ह्यात वारे नसतील, पण पाऊस पडेल. संध्याकाळपर्यंत निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव राहील आणि नंतर कमी होईल. वादळाचा प्रभाव कमी होईल, तसा पाऊसही कमी होईल, अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.