'निसर्गा'चा तडाखा पाहून पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पंतप्रधानांनाही भेटणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे.

Updated: Jun 11, 2020, 04:25 PM IST
'निसर्गा'चा तडाखा पाहून पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पंतप्रधानांनाही भेटणार title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातली बैठक संपली आहे. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी आणखी कोणती मदतीची घोषणा केली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असणार आहे. कारण चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा केलेल्या शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, उदय सामंत उपस्थित होते. तेव्हा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी काय घोषणा होते, हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.

वीज पुरवठा लवकरात लवकर सूर करण्याच्या सूचना यावेळी शरद पवार यांनी बैठकीत केल्या. तर पंचनामे पूर्ण झाल्यावर शरद पवार हे पंतप्रधान यांना भेटणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी दिली. तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा यावेळी तटकरे यांनी केला.

राज्य सरकारने आणखी काय निर्णय घेणं अपेक्षित आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली. कोकण दौऱ्यात पवारांनी जे पाहिलं, त्याच्या सूचना त्यांनी राज्य सरकारला देण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटले, यामध्ये कोणतंही राजकारण नसल्याचं तटकरेंनी स्पष्ट केलं.