मुंबादेवीची कृपा, विठु माऊलीचे आशिर्वाद; मुख्यमंत्र्यांकडून सर्वांचे आभार

चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या सर्वांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

Updated: Jun 3, 2020, 11:04 PM IST
मुंबादेवीची कृपा, विठु माऊलीचे आशिर्वाद; मुख्यमंत्र्यांकडून सर्वांचे आभार title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं होतं. मुंबईसह पालघर, अलिबाग, कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग, रत्नागिरी, रायगडसह अनेक ठिकाणी वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, एनडीआरएफच्या टीम सज्ज करण्यात आल्या होत्या. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या सर्वांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत.

एका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ?

महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट असतानाच चक्रीवादळाचा तडाखा बसला. संकट मोठं होतं. पण हे संकट आपण सगळ्यांनी परतवून लावलं आहे. जनता आणि प्रशासनाने झुंज देत  संकटाची तीव्रता कमी केली. मुंबा देवीची कृपा मुंबईवर आहे. तशी पंढरपूरच्या विठु माऊलींचे आशीर्वादही असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

निसर्ग वादळ कोणत्या जिल्ह्यांत जाणार? कधी संपणार?

या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथकं या सर्वाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. वृत्तवाहिन्यांकडूनही लोकांना चांगली माहिती देण्यात येत होती. निसर्गापुढे कोणाचंही चालत नाही. पण संकट काळात महाराष्ट्र एक आहे, खंबीर आहे हेच वादळात दिसून आलं, हीच आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

या वादळात दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला. कोकणासह इतर काही भागात नुकसान झालं आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई, कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. पण निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून स्थिर होण्यास थोडा वेळ लागेल, असं हवामान विभागाने सांगितले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा मान्सूनच्या आगमनावर परिणाम होणार?