राज्यात पूरस्थिती असताना भाजपचे नेते सरकार पाडण्यात व्यस्त! राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप

पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून रचले जात असून यामागे महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा आरोप

Updated: Jul 26, 2021, 07:58 PM IST
राज्यात पूरस्थिती असताना भाजपचे नेते सरकार पाडण्यात व्यस्त! राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप title=

मुंबई : 18 जुलैपासून राज्यात पूरस्थिती आहे आणि याच काळात भाजपचे नेते झारखंड सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पैसे देऊन आमदारांना विकत घेण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचे सरकार पाडण्यासाठी पैसे देऊन आमदार फोडण्याचे कटकारस्थान भाजपकडून रचले जात असून यामागे महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला. 

महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा आरोप

अभिषेक दुबे या पत्रकाराला झारखंडमध्ये अटक केल्यानंतर त्याने पोलीस चौकशीत ही माहिती दिल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तीन आमदारांना दिल्लीला बोलावण्यात आलं, दिल्लीत जयकुमार बेलखेडे या व्यक्तीने, जो नागपूर निवासी आहे, त्याने या तीन आमदारांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेलं, तिथे या आमदारांशी महाराष्ट्रातील भाजपचा एक माजी मंत्री देखील गेला होता, हा माजी मंत्री म्हणजे विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. 

तसंच 21 जुलैला भाजपचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोहित कंभोज पैसे घेऊन झारखंडच्या हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र पोलिसांची कुणकुण लागल्यानंतर या लोकांनी तिथून पळ काढला, पोलिसांनी या हॉटेलवर टाकलेल्या धाडीत मोठी रक्कम मिळाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. झारखंडमध्ये सरकार पाडण्यासाठी 50 कोटी आणि मंत्रीपद देण्याचं आमिष दाखवण्यात आल्याचं काँग्रेसचे आमदार सांगतायत, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

झारखंड सरकारकडून एसआयटी स्थापन

घोडेबाजार करून सरकार पाडण्याचा भाजपचा डाव उघड झाला आहे. याप्रकरणी झारखंड सरकारने एसआयटीची तीन पथके स्थापन केली असून यापैकी एक पथक झारखंडमध्ये, तर दुसरे दिल्लीत आणि तिसरं पथक महाराष्ट्रात तपासासाठी येणार आहे. झारखंडची एसआयटी टीम महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना पूर्ण सहकार्य करु,' अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात पूरपरिस्थिती असताना शेकडो कोटी रुपये ओतून झारखंड सरकार पाडण्याचा कट भाजपचे लोक करत होते, पूरपरिस्थितीत हेच पैसे लोकांच्या मदतीसाठी देता आले असते, मात्र झारखंडचे सरकार पाडण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे,' असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही. भाजपला ते शक्य नाही असेही त्यांनी भाजपला ठणकावून सांगितले.

बावनकुळे यांनी आरोप फेटाळले 

झारखंड सरकार पाडण्याच्या कट प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांपैकी एकाने चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेतल्याचा आरोप होतो आहे.  चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र आपला यामध्ये काहीही हात नसल्याचं म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, 'मी कधीही झारखंडला गेलेलो नाही त्यामुळे सरकार पाडण्याचा संबंधच नाही. माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही' असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.