मुंबई : कोरोना (Corona) विषाणूच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेचा तडाखा बसूनही आता महाराष्ट्र या आघातातून सावरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी तयार होऊ पाहत असतानाच राज्यातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद दिल्याचं स्पष्ट होत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची एकट्या महाराष्ट्रातील संख्या एक कोटींवर पोहोचली आहे.
1 कोटी नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेण्याच्या बाबतीत (Maharashtra) महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे. राज्यात एकिकडे कोरोनाच्या संकटाची तीव्रता अद्यापही कायम असल्याचं चित्र काही भागांत दिसत असतानाच दुसरीकडे लस घेत कोरोनाविरोधातील लढ्यात नागरिकांचं योगदान उल्लेखनीय कामगिरी बजावताना दिसत आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना लसीकरण मोहिमेला मिळणारा प्रतिसाद पाहता आता येत्या काळात राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लस देत कोरोनापासून दूर ठेवण्याचं लक्ष्य राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं हाती घेतलं आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार राज्य सरकारचे आरोग्य विभाग सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी लसीकरण मोहिमेतील या महत्त्वाच्या टप्प्यासाठी सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं कौतुक केलं आहे.
Maharashtra becomes the first state to have over 1 crore people vaccinated with both doses of #COVID19 vaccine: Maharashtra Health department
(File pic) pic.twitter.com/K9EP0NAO64
— ANI (@ANI) July 26, 2021
पालकांना मोठा दिलासा; खासगी शाळांच्या फीमध्ये मिळणार 'एवढी' सूट
लसींचा तुटवडा, नैसर्गिक आपत्ती, काही भागांत लसीकरण मोहिमेसाठीच्या जनजागृतीचा अभाव अशा अनेक अडचणींचा सामना करत आणि प्रत्येक आव्हान पेलत राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं हा टप्पा गाठला आहे. ज्यामुळं येत्या काळात आरोग्य विभाग आणि सरकारही कोरोनाविरोधातील लढ्यात आणखी जोमानं कामगिरी करेल अशीच अपेक्षा ठेवली जात आहे.