Chinese Firecrackers : जेएनपीटीच्या न्हावा शेवा येथील सीमाशुल्क सेंट्रल इंटेलिजन्स युनिटच्या दक्षता पथकाने दोन कंटेनरच्या संशयास्पद हालचाली रोखत शुक्रवारी 11 कोटी रुपये किमतीचे 40 मेट्रिक टन प्रतिबंधित चिनी फटाके जप्त केले. या कंटेनरमध्ये स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे ब्रश व मॉपच्या नावाने फटाक्यांची तस्करी करण्यात येत होती. मात्र तपास यंत्रणांनी कारवाई करत तब्बल 11 कोटींचे फटाके जप्त केले आहेत.
भारतात फटाक्यांची आयात सीमाशुल्क नियमांनुसार प्रतिबंधित आहे. तसेच रेड लीड आणि लिथियम सारख्या विषारी रसायनांसह निकृष्ट दर्जाच्या विदेशी फटाक्यांचा ओघ रोखण्यासाठी विदेशी व्यापार महासंचालनालय कडून आयात परवाना आवश्यक आहे. मात्र डीजीएफटीकडून फटाक्यांचा आयात परवाना मिळवण्याची प्रक्रिया कठीण आहे. त्यामुळे ही प्रक्रिया टाळण्यासाठी अवैध मार्गाने हे फटाके आणण्यात नाव्हा शेवा बंदरावर आणण्यात आले होते. सण आणि लग्नाच्या हंगामात या फटाक्यांना मोठी मागणी आहे. ती पूर्ण करण्यासाठी आयातदार फटाक्यांची तस्करी करतात.
या फटाक्यांमध्ये जस्त व लिथीयन यांचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. देशात याच्या वापराबाबत काही नियम आहेत. स्त व लिथीयन यांच्या अधिक वापरामुळे श्वसनाचे आजार होऊ शकतात. बंदी असूनही इतर वस्तूंच्या नावाखाली चीनमधून फटाक्यांची तस्करी केली जात असल्याचे समोर आलं आहे. आता जप्त केलेले फटाके पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
कशी झाली कारवाई?
सीमाशुल्क विभागाला 40 फुटांच्या कंटेनरमधून चीनमधून फटाके आणण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाने न्हावा शेवा परिसरात हे कंटेनर अडवले. कंटेनरची तपासणी केली असता त्यात विनापरवाना चिनी फटाके आणण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर फटाक्यांची आयात करणाऱ्या व्यक्तीबाबत सीमाशुल्क विभागाने अधिक तपास सुरु केला आहे.
दरम्यान, काही वर्षांपूर्वी देखील न्हावा शेवामध्ये केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाई करत बेकायदेशीर चायनीज फटाके जप्त केले होते. कस्टम विभागाने बेकायदेशीररित्या आयात करण्यात आलेले 38 कोटी 32 लाख रुपये किंमतीचे चायनीज फटाके जप्त केले होते. कर्कश आवाज आणि ध्वनी प्रदुषणामुळे चायनीज फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र वारंवार समुद्रामार्गे चायनीज फटाके आयात केले जात असल्याचं समोर आलं होतं.