नरेंद्र मोदींचे पंतप्रधानपद जाणार; शरद पवारांचे भाकीत

मी नरेंद्र मोदींना समर्थन देणार नाही.

Updated: Oct 23, 2018, 01:27 PM IST
नरेंद्र मोदींचे पंतप्रधानपद जाणार; शरद पवारांचे भाकीत title=

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होऊन मोदींना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागेल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तवले आहे. ते मंगळवारी 'आज तक' वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पवारांनी म्हटले की, २०१९ मध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होईल. ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांच्या हाती राहणार नाही. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल. परंतु, मी नरेंद्र मोदींना समर्थन देणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

नरेंद्र मोदींची प्रतिमा ही अटलबिहारी वाजपेयींसारखी नाही. दोघांच्या व्यक्तिमत्वात बराच फरक आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. सर्व पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. ज्यांच्याकडे बहुमत असेल त्यांना संधी देण्यात येईल, असे पवारांनी सांगितले. 

यावेळी त्यांना तुम्ही पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहात का, असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, पवारांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. 

२००४ मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. २०१९ मध्ये तीच परिस्थिती असेल. निवडणुकीनंतर सर्व पक्ष मनमोहन सिंग यांच्या समर्थनार्थ एकवटले होते आणि ते पंतप्रधान झाले. २००४ मध्ये जशी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती २०१९ मध्ये असेल. मात्र, मोदींचे नेतृत्व सर्वांना मान्य होणार नाही, असे पवारांनी सांगितले.