Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहिर शाहाला (Mihir Shah) अखर अटक करण्यात आलं आहे. तब्बल दोन दिवसांनंतर मिहिरला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपघातानंतर फरार झालेल्या मिहिर शहाविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीसही (Look Out Notice) जारी केली होती. मिहिर शाहाला विरारमधून (Virar) अटक करण्यात आली असून त्याच्याबरोबर आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मिहिर शाहा हा वरळी हिट अँड प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मिहिरबरोबरच पोलिसांनी मिहिरची आई आणि बहिणीलाही ताब्यात घेतलं आहे. गुन्हे शाखेने आरोपीला मदत करणाऱ्या तब्बल 12 लोकांनाही ताब्यात घेतलं आहे.
मुख्य आरोपी मिहीर हा पालघरमधील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. दारुच्या नशेत भरधाव BMW कार चालवणाऱ्या मिहीरनं रविवारी म्हणजे सात जूनला सकाळी वरळीत एका दुचाकीला उडवलं अपघातात जखमी नाखवा दाम्पत्याला मदत करण्याऐवजी त्यानं कारखाली सापडलेल्या महिलेला फरफटत नेलं. त्यात कावेरी नाखवा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचे पती यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Worli Hit and Run)
काय आहे नेमकी घटना?
मुंबईतल्या वरळी इथे राहणारे प्रदीप नाखवा (Pradeep Nakhava) आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा (Kaveri Nakhava) वरळीच्या कोळीवाड्यात (Worli Koliwada) राहतात. त्यांचा मासे विकण्याचा व्यवसाय असून त्यावरच ते पोट भरतात. ससून डॉक येथून मासे खरेदी करुन ते परतत असताना रविवारी पहाटे बीएमडब्ल्यूने (BMW) त्यांच्या स्कूटरला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघे हवेत फेकले गेले. कावेरी यांना कारने फरफटत नेलं. त्यांना रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
आरोपीने केलं होतं मद्यप्राशन
पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार मिहिर शाहच्या नावावर नोंदणीकृत आहे. अपघाताच्या वेळी मिहीर शाह आणि त्याचा चालक कारमध्ये होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर शाहने शनिवारी रात्री जुहू इथल्या एका बारमध्ये मद्यपान केलं. घरी जाताना त्याने ड्रायव्हरला लाँग ड्राईव्हला घेऊन जाण्यास सांगितलं. गाडी वरळीला आली आणि मग मिहीरने गाडी चालवण्याचा हट्ट धरला. त्याने स्टेअरिंग हातात घेतल्यानंतर काही वेळातच भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यूने नाखवा दांपत्याच्या स्कूटरला धडक दिली.
राजेश शहानेच दिला होता पळून जाण्याचा सल्ला
वरळी हिड अँड रन प्रकणातील आरोपी मिहिरला त्याच्याच वडिलांनी म्हणजेच शिवसेना उपनेते राजेश शाह यांनी या अपघातानंतर पळून जाण्याचा सल्ला दिल्याचं पोलीस तपासातून उघड झालं. शिवसेना उपनेते राजेश शाहंनी वरळीतील अपघातानंतर मुलगा नव्हे, चालक गाडी चालवत असल्याचं सांगू, तू पळून जा असा सल्ला दिला होता. प्रदीप आणि कावेरी नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर आरोपी मिहीरनं वडील राजेश शाहशी संपर्क साधला तेव्हा त्याला हा सल्ला देण्यात आला होता.