मुंबई : गणेशोत्सवात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना दिलासा देण्यात आला आहे. मुंबईमध्ये लागू असलेली २० टक्के पाणीकपातीपैकी १० टक्के पाणीकपात महापालिका मागे घेणार आहे. मुसळधार पावसानंतर १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ९५ टक्के भरल्यास संपूर्ण २० टक्के पाणीकपात मागे घेतली जाईल, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं ८५ टक्के भरली आहेत.
५ ऑगस्टपासून मुंबईमध्ये २० टक्के पाणीकपातीला सुरुवात झाली होती. जून आणि जुलै महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी कपात करण्याची वेळ आल्याची टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली होती. कोविडमुळे हात धुण्यासाठी अधिक पाणी लागत असताना आणि आता सणासुदीच्या काळात पाणीकपात केल्यामुळे नागरिकांना त्रास होणार आहे. तसंच लॉकडाऊन काळात कार्यालयं बंद होती, तेव्हा पाण्याचा वापर कमी झाला, तरीही पाणीकपात करावी लागत आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेनं पाण्याचा हिशोब जनतेसमोर ठेवून पाणीवाटपाचं नियोजन करावं, असं शेलार म्हणाले होते.