मुंबई : मुंबईकरांसाठी चिंतेची बातमी समोर येतेय. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. क्वारंटाईन असलेल्यांची संख्या देखील वाढतेय. पण तुलनेत लसीकरणाचं प्रमाण कमी झालेलं दिसतंय. मुंबईत लसीकरण केंद्राची संख्या वाढवण्यात आलीय. या केंद्रावर लोकांच्या रांगा देखील पाहायला मिळतायत. पण याठिकाणी लसटंचाई जाणवू लागलीय. लसीकरणाच्या वेगावर याचा परिणाम होतोय.
रविवारी तब्बल ३५ खासगी केंद्रांनी लस साठय़ाअभावी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली. त्यामुळे दिवसभरात अर्ध्या संख्येने म्हणजेच 27 हजार 189 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
मुंबईत सध्या होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 6लाख 71हजाराहून अधिक आहे. अशा रुग्णांपर्यंत पालिकेचे कर्मचारी पोहोचत असून त्यांचे समुपदेशन केलं जातंय. आरोग्य विभाग आणि प्रोजेक्ट स्टेप वन संस्थेच्या पुढाकाराने रुग्णांना मानसिक आधार देण्याचे प्रयत्न केले जातायत.
ज्या रुग्णांना निराश वाटतंय एकटेपणा जाणवतोय त्यांच्यासाठी 1800-102-4040 हा मदत क्रमांक जाहीर करण्यात आलाय. अशा रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी डिजिटल पुस्तिकाही तयार करण्यात आलीय.