मुंबई विद्यापीठाचा पेपर चेकींगचा गोंधळ तरीही पुढील परीक्षा ऑनलाईनच

मुंबई विद्यापीठाच्या निकालानंतर आता पुन्हा मुंबई विद्यापीठ नव्या वादामुळे चर्चेत आलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीचं गौडबंगाल उघड झालंय.

Updated: Nov 3, 2017, 09:37 AM IST
मुंबई विद्यापीठाचा पेपर चेकींगचा गोंधळ तरीही पुढील परीक्षा ऑनलाईनच title=

मुंबई : ऑनलाईन पेपर चेकींगमुळे यावर्षी मुंबई विद्यापीठाचं तोंड यावर्षी चांगलंच पोळलं तरीही नोव्हेंबरमध्ये होणारी विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन असेसमेंट पद्धतीनेच होणार आहे. ४ लाख १० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहे.

२८३ कॅप सेंटर ऑनलाईन तपासणीसाठी असणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेलं सॉफ्टवेअरही अपडेट करण्यात आलंय. महत्त्वाचं म्हणजे यावर्षीपासून विद्यार्थ्यांना सप्लिमेंट  मिळणार नाही. ४० पानांची मुख्य उत्तर पत्रिकाच पुरेशी आहे अशी भूमिका विद्यापीठाने घेतलीय.

मुंबई विद्यापीठाच्या निकालानंतर आता पुन्हा मुंबई विद्यापीठ नव्या वादामुळे चर्चेत आलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीचं गौडबंगाल उघड झालंय. १६ हजार ८००  प्राध्यापकांपैकी ३ हजार ७०० प्राध्यापकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नसल्याचं उघड झालंय. त्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. तर यावर्षीही विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन असेसमेंट पद्धतीनेच होणार आहे.

म्हणजेच जवळपास २५ टक्के प्राध्यापकांनी एकही उत्तर पत्रिका न तपासल्याचं उघड झालंय. अशा कामचुकार प्राध्यापकांची माहिती घेऊन त्यांच्य़ावर कारवाई कऱण्याचा विचार विद्यापीठ करत आहे.  मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नीरज हातेकर आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक यांनी पेपर तपासणीसाठी एकदाही लॉग-ईन न केल्याचं समोर आलंय. मात्र आपला विभाग स्वायत्त  असल्यामुळेच उत्तरपत्रिका न तपासल्याचं स्पष्टीकरण हातेकरांनी दिलंय.

मात्र या ऑनलाईनच्याच गोंधळाप्रकरणी हातेकरांनी राजीनामा देऊ केला होता. तसंच आता ते कुलगुरूपदाच्या शर्यतीत असल्याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचा आणखी एक अजब गोंधळ समोर आलाय. पदवीच्या ३५ ते ४० विद्यार्थ्यांचे निकाल तयार आहेत. मात्र हे विद्यार्थी कोण आहेत तेच माहित  नाही. त्यामुळे हे निकाल पडून आहेत. स्कॅनिंग आणि बारकोडच्या घोळामुळे हा गोंधळ झालाय.  विद्यार्थी समोरून दावा करत नाहीत तोपर्यंत हे निकाल देता येणार नाहीत. अद्याप ९५ विद्यार्थ्यांचे  निकालही प्रलंबित असल्याची माहिती परीक्षा नियंत्रक घाटुळे यांनी दिलीय.